श्री कालभैरवांचा अवतारकथा व महिमा
श्री काळभैरवनाथ अवतारकथा
( सदर कथा काशी खंड ग्रंथाप्रमाणे )
श्री क्षेत्र रुंधाटी, तालुका अमळनेर , जि. जळगाव येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचे मंदिर 8०० ते 8५० वर्षांपूर्वीचे असून श्री काळभैरवनाथ रुंधाटी व पंचक्रोशीतील जनतेचे कुलदैवत आहे. नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे. एकदा श्री विष्णु व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आपणांमध्ये श्रेष्ठ कोण, यावर वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणाले,
“मी सर्व सृष्टीचा कर्ता आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे.”
त्यावर विष्णु म्हणाले,
“मी त्या सृष्टीचा पालनकर्ता व तारणहार आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे.”
दोघांचा वाद मिटेना. त्यावेळी तेथे नारदमुनींचे आगमन झाले. नारदमुनींनी वाद मिटवण्यासाठी सल्ला दिला की, तुम्ही बद्रीकाश्रमी जावे. तेथे मुनीश्वर अत्री ऋषी, मार्कंडेय ऋषी, बदकाल्लभ ऋषी, दधीची ऋषी, मारीची ऋषी, पिप्पलाद मुनि आहेत. तेथे तुमचा वाद मिटू शकतो.
ते दोघे बद्रीकाश्रमि गेले. तेथे गेल्यावर त्यांनी सर्व ऋषीमुनींना विचारले,
“आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, हे तुम्ही सांगावे.”
सर्व ऋषीमुनींनी नमस्कार केला. तेव्हा विष्णु म्हणाले,
“तुम्ही आमच्या दोघांपैकी कुणाला नमस्कार केला?”
त्यावर ऋषीमुनी म्हणाले—
असंख्य ब्रह्मांड जयाचा खेळ |
घडिता मोडीता न लगे वेळ ||
तो ब्रह्मरूप मृगांकथाळ |
अकथ्य जाहला शिव तो ||
“आम्ही तुम्हा दोघांना नव्हे, शिवाला नमस्कार केला आहे. तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरीत बुद्धी आहे. तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हेच श्रेष्ठ आहेत.”
या उत्तराने त्या दोघांचे समाधान झाले नाही. त्यावर ऋषीमुनी म्हणाले,
“ईशान्य दिशेला वेदपुरी आहे. तेथे जाऊन वेदांना कोण श्रेष्ठ आहे, हे विचारा.”
विष्णु व ब्रह्मदेव वेदपुरीस पोहोचले. महाद्वारात त्यांना शिवाची प्रतिमा दिसली. वेदपुरीमध्ये गेल्यावर त्यांना यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद व ऋग्वेद भेटले. आपले प्रयोजन सांगितल्यावर वेद म्हणाले,
“तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहात. हा तुमचा वाद व्यर्थ आहे. भगवान शिवच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या बरोबरीची कोणीच स्पर्धा करू शकत नाही.”
हे ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला. त्यांनी वेद व ऋषीमुनींचा अपमान केला. तेव्हा वेदांनी त्यांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला.
ते दोघे ओंकारेश्वराकडे गेले. ओंकारेश्वरांनीही सांगितले,
“हा वाद व्यर्थ आहे. सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे.”
हे ऐकून विष्णु व ब्रह्मदेव अधिकच क्रोधित झाले व तेथेही ऋषीमुनी, वेद व ओंकारेश्वरांचा अपमान केला.
वेदांचा, ऋषीमुनिंचा व ओंकारेश्वरांचा अपमान झाल्यामुळे श्री शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी आपला उजवा हात आपटला आणि त्या क्षणी उग्ररूप, लांब जटा, हाती त्रिशूल, कंठी रुद्रमाला, कानात कुंडले धारण केलेले श्री काळभैरवनाथ अवतरले.
श्री काळभैरवनाथांनी विचारले,
“मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे?”
श्री शंकर म्हणाले,
“ब्रह्मा व विष्णु यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद आहे. तो तू मिटव.”
श्री काळभैरवनाथ वेदपुरीस आले. त्यांनी ब्रह्मदेवास एकवीस स्वर्गात जाऊन मुकूट पाहण्यास सांगितले व विष्णूंना सप्तपाताळात जाऊन पादुका पाहण्यास सांगितले.
विष्णु सप्तपाताळात जात असता पाताळकंद म्हणाले,
“लक्षकोटी युगे झाली, अनंत कोटी विष्णु येथे येऊन अजून परतले नाहीत.”
हे ऐकून विष्णुचा अहंकार संपला.
इकडे ब्रह्मदेव स्वर्गात मुकूट शोधत असता कामधेनु व केतकी भेटल्या. त्यांनी सांगितले की अनंत ब्रह्मांड फिरल्यावरही मुकूट सापडणार नाही. तरीही ब्रह्मदेवांनी खोटे बोलून मुकूट पाहिल्याचे सांगण्यास त्यांना सांगितले.
श्री काळभैरवनाथांनी खोटेपणा ओळखून ब्रह्मदेवाचे शिर उडवले. कामधेनु व केतकीस शाप दिला. नंतर उ:शापही दिला.
भगवान शिव प्रकट होऊन म्हणाले,
“हे ब्रह्मशिर घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर. जिथे ते गळून पडेल, तिथे तुझे पातक संपेल.”
श्री काळभैरवनाथांनी पाताळ, स्वर्ग, वैकुंठ व अकरा ज्योतिर्लिंगांची यात्रा केली. अखेर काशीक्षेत्री ब्रह्मशिर गळून पडले व ब्रह्महत्येचे पातक समाप्त झाले.
काशीत आठ लक्ष वर्ष अनुष्ठान केल्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले व वरदान दिले की,
“तू चौसष्ट कोटी शिवगणांचा अधिपती व काशीक्षेत्राचा रक्षक असशील. काशीतील प्रथम पूजेचा मान तुला मिळेल.”
श्री काळभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूतही वंदन करतात. श्री काळभैरवनाथांचा महिमा जो वाचतो किंवा श्रवण करतो त्याला बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य मिळते.

कालभैरव बाबांची आरती
आरती ओवाळू भावें, श्री काळभैरावाला ||
दिनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ||
देवा, प्रसन्न हो मजला || धृ ||
धन्य तुझा अवतार जागी, या रौद्ररुपधारी |
उग्र भयंकर भव्य मुर्ति, परि भक्तांसी तारी |
काशीक्षेत्री वास तुझा, तू तिथला अधिकार |
तुझिया नामस्मरणे, पळती पिशाच्चादि भारी ||
पळती पिशाच्चादि भारी II आरती …..|| १ ||
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती |
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती |
क्षमा करावी, कृपा असावी, सदैव मजवरती |
भक्त दिलीप म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ||
देवा घडो तुझी भक्ती II आरती …. || २ ||
BABA
PENDING
